Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महापौरांच्या प्रभागात प्लास्टिक मुक्त अभियानास सुरुवात

पिंपरी : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड हे शहर प्लास्टिकच्या कच-यापासून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिका व सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने प्रभाग क्र.२ जाधववाडी, चिखली येथे महापौर श्री. राहूल जाधव यांच्या हस्ते झाली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर २०१४ पासून देशात स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यास पाच वर्ष पूर्ण होत आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी २ ऑक्टोबर २०१९ पासून प्लास्टिक मुक्त अभियान चालविण्यात येणार आहे. देशात प्रत्येक दिवसाला साधारणत: १५ हजार टन प्लास्टिक कचरा जमा होतो. प्लास्टिक कच-याने वातावरण आणि निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. प्लास्टिक कचरा मोकाट फिरणारी जनावरे, प्राणी यांनी खाल्यास त्यांना दुर्धर आजार होण्याची शक्यता असते तसेच प्राण्यांचा जीव जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कापडी पिशव्यांच्या वापरासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत महापौरांनी व्यक्त केले.

याप्रसंगी महापौर श्री. राहुल जाधव यांच्या हस्ते प्रभागातील महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळावे असे आवाहन देखील महापौर श्री. राहूल जाधव यांनी केले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय कार्यालयाचे श्री बी. बी. कांबळे, सहाय्यक आरोग्यधिकारी, श्री. व्ही केंचनगोडार, आरोग्य निरीक्षक, प्रभागातील साफसफाई कर्मचारी तसेच सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेनशनचे श्री. संतोष सिंग, उपनियंत्रक, श्री. गोपाळ झा, श्री. विनोद पाठक आणि प्रभागातील श्री. प्रताप भांबे, श्री. संभाजी आबा घारे, श्री. सुरेंद्र लोखंडे, श्री. कोंडीराम आबा भांगे, श्री. दत्ता खबाले, श्री. प्रशांत राऊत, श्री. भालचंद्र दरगूडे, श्री. अमर चांगभले व बचत गटातील असंख्य महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.

Exit mobile version