अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधितांना प्रशासनानं तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसंच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशीही या परिस्थितीवर चर्चा केली. सध्या बचाव आणि तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा आणि नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरु करावेत असंही निर्देश त्यांनी दिले. यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसंच स्थानिक पोलीस यंत्रणेनं उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. एनडीआरएफचे पथक उस्मानाबाद आणि लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला.