मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून बऱ्याच ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यभरातल्या पावसासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी दिलेलं वृत्त .
यवतमाळ जिल्ह्यातल्या पैनगंगेला पूर आला असून मार्लेगाव पुलावर पाणी आल्याने बोरी तुळजापूर महामार्ग बंद झाला आहे. बुलढाणा जिल्यातल्या पेनटाकळी धरण भरल्यानं त्या धरणाचे दरवाजे उघडल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
वाशिम जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं आणि पशुधनाचं नुकसान आणि घरांची पडझड या संदर्भात सरसगट सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी करणारं निवेदन रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांना दिलं आहे.
विदर्भ मराठवाडा सीमेवरच्या ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच मार्लेगाव पुलावरची वाहतूक बंद केली आहे. पुरस्थितीमुळे नागपूर बोरी तूळजापूर हा महामार्ग बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनं थांबविण्यात आली आहे. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरधार पाऊस चालू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामधल्या देवजना परिसरात कयाधू नदीच्या महापुरानं गेल्या 48 तासापासून शेतांना वेढा घातला आहे शेतात आखाड्यावर अडकलेल्या नागरिकांना आज सकाळी बाहेर काढण्यात आले. भयग्रस्त झालेले नागरिक पुरातून सुटकेचा श्वास सोडत गावात आश्रयाला आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं सकल भागात पाणी साचललं आहे. शहादा शहराला लागुन असेलल्या अनेक नाले आणि ओढ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पुराचे पाणी लगतच्या वसाहतीमध्ये घुसलं आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसरात रात्रीपासून संततधार सुरू असून त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे आज दुपारी सुमारे दहा ते पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलं आहे. अतिवृष्टीमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. नांदेड शहराजवळच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातल्या वरच्या भागातून पाण्याची आवक वाढली असल्यामुळे आज सकाळ पासून एकुण १४ दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
या विसर्गामूळं गोदावरी नदीला नांदेड जिल्ह्यात पूर आला आहे. या पूराचे पाणी सखल भागात शिरले असून पिकांची नासाडी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडले असून दहा हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातल्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जायकवाडी धरण पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे. मुंबई आणि उपनगरात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे.