मराठवाड्यातल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही लख्ख सुर्यप्रकाश असून मागील दोन दिवसात कुठेही पावसाची नोंद झाली नाही. असं असल तरी जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर आदी धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सखल भागातील संपूर्ण पिकं वाया गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पैठणच्या जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव,दिग्रस बंधाऱ्यातून विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून सिध्देश्वर धरणाखाली पुर्णा नदीत विसर्ग सुरु आहे.
नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा १०० टक्के भरल्यानं गोदावरी नदीत ऊसावा म्हणजे बॅक वॉटर निर्माण होतो. विष्णुपुरी प्रकल्पातून विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग शहरातून वाहणार असल्यानं जुन्या पुलावरील पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. शहरातील नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.उर्ध्व मानार प्रकल्प आणि निम्न मानार प्रकल्पही १०० टक्के भरलं असून तिथं अतिवृष्टी झाल्यानं पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सकाळी ११ वाजता २ हजार ३६९ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे.
उर्ध्व पैनगंगा धरण १०० टक्के भरल्यानं पाणी सोडण्यात आलेले आहे. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करण्याच आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी केलं आहे. तसचं वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या ०२४६२-२६३८७० या दुरध्वनी क्रमांक नियंत्रण कक्षातून मिळेल,असंही त्यांनी सांगितलं. नंदूरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पीकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील जवळपास २०४ गावांमध्ये बत्तीशे हेक्टर वरील पीकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही जलाशयातून पूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे.
परभणी ते वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील रहाटी येथील पूर्णा नदी वरील पुलावरून या पुराचं पाणी वाहतय. त्यामुळे रहाटी पुलावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे परभणी ते नांदेड परभणी ते हिंगोली कडील वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत सहा लाख ६५ हजार ९१० शेतकरयांचं पाच लाख २४ हजार २१२ हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं असून प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान अडिचशे कोटी रूपयाचं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर चारशे पेक्षा जास्त लहान मोठी जनावरं ही मृत्यूमुखी पडले आहे. तीनशेच्या जवळपास घराची तर जवळपास दोन हजार झोपड्याचं नुकसान झालं आहे.
५७ लहानमोठी पूलं वाहून गेली आहे तर ३२ तलाव फुटले आहेत. बुधवारी मात्र पावसाने चांगलीच उघडीप घेतली, चार दिवसानंतर जिल्हावासियांना सूर्यदर्शन झाले. जायकवाडी धरणात पाण्याची आवक एक लाख क्यूसेक पेक्षा जास्त असल्याने धरणाचे दरवाजे हे उघडण्यात आले आहेत, त्यामुळेच गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कुठलीही अप्रिय घटना घडू नये या करता पोलीसांना तैनात करण्यात आलं आहे.