कोरोनाप्रतिबंधात्मक लस निर्मिती प्रकल्पाच्या मान्यतेसाठीचा भारत बायोटेकचा अर्ज अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातील मांजरी इथल्या लस निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी करणारा अर्ज भारत बायोटेक तर्फे पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर पुण्याजवळील मांजरी इथली वन विभागाच्या मालकीचा जागा कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सीन लसीच्या उत्पादनासाठी भारत बायोटेकला देण्यात आली असून लस निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी तिथं करण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या या प्रकल्पाला अन्न आणि औषध प्रशासनाची अंतिम मान्यता घेणे आवश्यक असून अनेकवेळा स्मरणपत्र पाठवल्यानंतर भारत बायोटेकतर्फे हा अर्ज सादर करण्यात आला आहे. सर्वप्रथम लस निर्मिती प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून लस निर्मितीसाठीचा अंतिम परवाना कंपनीला दिला जाईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं मांजरीच्या प्रकल्पात लस निर्मितीला प्रारंभ होईल. कंपनीकडून ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होत असल्यानं लसींच्या उत्पादनासही वेळ लागणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं .