राज्यातल्या शहरी भागात ८ वी ते बारावी तर ग्रामीण भागात ५ वी ते ७ वीच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातल्या शाळा सुमारे दीड वर्षांनी आजपासून प्रत्यक्षरित्या सुरु झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करून हे वर्ग सुरु करण्याची घोषणा राज्य सरकारनं केल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आजपासून वर्ग सुरु करण्यात आले. खूप दिवसांनी शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेचे वर्ग प्रत्यक्ष सुरु झाल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गायकवाड यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुंबईत कुलाबा इथल्या मुंबई महानगरपालिकेच्या एका शाळेला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.आणि विद्यार्थ्यांना मास्क वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला. शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी सरकारनं जारी केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक आहे असं गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शाळांमध्ये जाऊन व्यवस्थेचा आढावा घेतला आणि विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये सरलादेवी माने हायस्कूलमध्ये जाऊन पालकमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत केलं.यावेळी फुले, शालेय साहित्य, सॅनिटायझर, मास्क, चॉकलेटचं वाटप करण्यात आलं. बीड जिल्ह्यात टोकवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आलं.
लातूर जिल्ह्यात आजपासून सुरू झालेल्या शाळांमध्ये जाऊन राज्यमंत्री, संजय बनसोडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात, लातूर शहरातील देशीकेंद्र विद्यालय , सरस्वती विद्यालय ग्लोबल नॉलेज स्कूल ,हजरत सुरत शहावली माध्यमिक उर्दू शाळा यांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जालना जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या पाचवी ते बारावी आणि शहरी भागातल्या आठवी ते बारावी वर्ग असलेल्या सुमारे २ हजार ४०० शाळा कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करत आजपासून सुरु झाल्या. अनेक शाळांममध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
वाशिम जिल्ह्यात शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. मात्र जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदान केंद्र ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांमध्ये असल्यानं ग्रामीण भागातील शाळा आज सुरू न होता त्या ८ ऑक्टोबर पासून सुरु होतील. शहरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. तसंच शाळेत विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.
नागपूर जिल्हयात ग्रामीण भागातील 5 वी ते 12 च्या तर शहरातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत हनुमान नगर परिसरातील मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना गुलाबाचं फुल देऊन स्वागत करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातील शाळाही आजपासून सुरु झाल्या. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच शाळा सुरु झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आलं. तापमान आणि ऑक्सिजन पातळी मोजून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.
नाशिक शहरातल्या ४८९ शाळांमध्ये आज घंटा वाजली. तसंच ६६ कनिष्ठ महाविद्यालयं देखील सुरू झाली. आज बहुतांश शाळांमध्ये या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं तसंच आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या दुसर्यात लाटेमुळे बंद ठेवण्यात आलेल्या धुळे जिल्ह्यातील शाळाही आज पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत . शहरी भागातील आठवी ते बारावीच्या सर्व माध्यमांच्या १३२ आणि ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीच्या सर्व माध्यमांच्या ६६५ अशा ७९७ शाळा सुरु करण्यात आल्या. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील शंभर टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात निवडणुक क्षेत्रातील शाळा वगळता अन्य ठिकाणच्या सर्व शाळा सुरळीत सुरु झाल्या. जिल्ह्यातील ग्रामीण दुर्मग भागातील शाळांमध्ये आज शालेय विद्यार्थ्यांचं पुष्प देत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे हे भादवड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वागतासाठी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दोन हजार ९० शाळा आज सुरू झाल्या. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी प्रत्येक शाळेत केली जात आहे. शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं तापमान तपासलं जात असून सॅनिटायझरनं हात निर्जंतुक केल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सर्व शाळा सकाळच्या एकाच सत्रात भरणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरी भागात ८ वी ते १२ वीचे तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी वर्ग आज पासून सुरू झाले आहेत. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसवण्यात आले. सातारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील २ हजार २८० शाळा सुरु झाल्या. या शाळांमध्ये आज पाहिल्या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं.
ठाणे जिल्ह्यातल्या दोन हजार ७५८ शाळा आजपासून सुरु झाल्या असून यात शहरी भागातील आठवी ते बारावीच्या एक हजार ७३८ तर ग्रामीण भागातील एक हजार २० पाचवी ते बारावीच्या शाळांचा समावेश आहे. ठाण्यातील सरस्वती मंदिर शाळेत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दहावीच्या वर्गात मराठीचा तास घेतला. पालघर जिल्ह्यातही आज शाळा सुरु झाल्या यावेळी बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन करून वर्गात प्रवेश देण्यात आला.
नवी मुंबईत आजपासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ७४ शाळांमध्ये वर्ग सुरू झाले असून आज पहिल्याच दिवशी सुमारे ७० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता अधिक रुग्ण संख्या असलेली ६१ गावं वगळता इतर गावांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे शाळा सुरू झाल्या.