कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आणि दरडी कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याच्या विविध जिल्ह्यात केंद्रीय पथक करत आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात विविध केंद्रीय पथकांचा पाहणी दौरा सुरू आहे. रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेला महापूर, दरडी कोसळून झालेलं नुकसान, आणि त्यानंतर राज्य सरकारनं कोणत्या उपाय योजना केल्या, याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक सध्या रायगडच्या दौऱ्यावर आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे संचालक अमेयकुमार, कृषी, सहकार, शेतकरी कल्याण विभागाचे संचालक सुभाष चंद्रा आणि केंद्रीय ग्रामीण विभागाचे आयुक्त आयुष पुनिषा यांचा या पथकात समावेश आहे. काल नागोठणे इथं झालेल्या बैठकीत महाड इथली पूरस्थिती, तसंच तळीये आणि साखर सुतारवाडी इथल्या भू:स्खलनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून पथकाला दिली. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र शासनाचं पथक आता खेड आणि चिपळूणची पाहणी करणार आहे. सांगली जिल्ह्यात हे पथक मिरज तालुक्यातल्या पूरबाधित क्षेत्राची आयर्विन पूल आणि मौजे डिग्रज इथं पाहणी करणार आहे. त्यानंतर शिरगाव इथं पूरबाधित क्षेत्रांची पाहणी करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानी कळवलं आहे.