Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रातील शिखर अकादमी म्हणून कार्यरत असणाऱ्या पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट होणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात यावर भर देण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

पु.ल.देशपांडे अकादमीला स्वायत्ता देण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, उपसचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राच्या कला परंपरेचे जतन करण्याचे काम या अकादमीच्या माध्यमातून होत असते. तर राज्यातील विविध कला क्षेत्रातील कलावंतांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना समृद्ध करण्यात अकादमीचा मोठा वाटा आहे. या अकादमीमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची कलेविषयी अभिरुची समृद्ध करण्यासाठी अकादमीने यापुढील काळात काम करणे आवश्यक आहे.आजच्या काळाशी सांगड असून येणाऱ्या काळात या अकादमीचा कायापालट करता येईल याबाबत अभ्यास करण्यात यावा.  तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील काम करणाऱ्या तज्ञ सल्लागार नेमून हे काम कशा पद्धतीने करता येईल याबाबतही माहिती घेण्यात यावी.

Exit mobile version