देशभरातल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना काळाचा ज्या साहसानं मुकाबला केला ते साऱ्या जगानं पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांच्या हस्ते उत्तराखंडच्या ऋषिकेश इथं २८ राज्यं आणि ७ केंद्रशासीत प्रदेशांमधल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते. ही संयंत्र पीएम केअर फंडाअंतर्गत उभारली आहेत. कोरोनाकाळ आला तेव्हा देशात केवळ एक प्रयोगशाळा होती त्याची संख्या आज एक हजारापर्यंत गेली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशात आज लोकार्पण होत असलेली ऑक्सीजन निर्मिती संयंत्र हे आपल्या सेवाभावाचे, एकात्मतेचे आणि कौशल्याचं प्रतिक आहे, असंही ते म्हणाले. ऋषिकेशच्या या देवभूमीत योग आणि आयुर्वेदाचा वास असल्यानं इथलं वातावरण आरोग्यदायी आहे असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. या देशात हिऱ्या मोत्यांसारख्या व्यक्तींची कमतरता नाही मात्र या साऱ्यांना एकत्र आणण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी केल्याचं मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यानंच देशात कोरोनाची लस निर्माण होऊ शकली असंही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या पुढाकारामुळे आज भारताची प्रतिमा जगात अधिक उंचावली असल्याचं मत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी व्यक्त केलं. देशभरातल्या या संयंत्रातून प्रत्येकी दररोज १ हजार ७५० मेट्रिक टन ऑक्सीजनची निर्मिती होणार आहे.