अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात ३४ लाख हेक्टर्सवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. केंद्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषानुसार हे नुकसान चार हजार कोटी रूपयांचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्यांनी काल औरंगाबादमध्ये, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून राज्य सरकार शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगात मदत करेल, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यातल्या नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पूर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचं पवार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर उद्या हा आढावा सादर केला जाईल, त्यानंतर त्यांच्या पातळीवर मदतीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.