Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील वस्तूंचे आयात शुल्क चीनकडून रद्द

बीजिंग : अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध चिघळत असतानाच चीनने अमेरिकेच्या १६ प्रवर्गातील उत्पादनांवरच्या आयात करात सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यात दोन्ही देशात  व्यापार चर्चा सुरू होणार असून, त्याआधीच एक सकारात्मक निर्णय घेऊन अमेरिकेवर प्रभाव पाडण्याचा चीनचा प्रयत्न दिसून येत आहे.

अमेरिकेने व्यापार युद्धात दणका दिल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. चीन व अमेरिका यांच्यात गेले एक वर्षभर व्यापार युद्ध सुरू असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. बुधवारी चीनने एकूण १६ प्रवर्गातील अमेरिकी वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्याचा निर्णय घेतला असून तो १७ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. हा निर्णय एक वर्षांसाठी अमलात राहील असे सांगण्यात आले.

सागरी उत्पादने व कर्करोगविरोधी औषधांसह काही वस्तूंचा यात समावेश असून आयात शुल्क रद्द केलेल्या वस्तूंच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. चीनने अमेरिकी वस्तूंवरचा आयात शुल्क  रद्द करण्याचा हा पहिलाच निर्णय असून यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवर आयात कर वाढवले होते. अल्फाल्फा पेलेट, माशांचे खाद्य, वैद्यकीय लिनियर प्रवेगक, मोल्ड रिलीज एजंट या वस्तूंवरचा आयात कर रद्द करण्यात आला आहे. यात सोयाबीन, डुकराचे मांस यांचा समावेश मात्र केलेला नाही.

Exit mobile version