पिंपरी : महाराष्ट्र कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने अटल सन्मान योजनेअंतर्गत पिंपळेगुरव, नवी सांगवी आणि सागवीमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नाने सुमारे एक हजार बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे.
केंद्र सरकारने बांधकाम कामगारांची ते काम करत असलेल्या परिसरात एक वेळचे जेवण देणारी योजना सुरू केली आहे. अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत उपक्रम राबविण्यात येतो. बांधकाम कामगारांची पोटाची भूक भागविणारी ही योजना चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रयत्न केले. त्यानुसार पिंपळेगुरव, नवी सांगवी आणि सांगवी परिसरात बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेला सुरूवात करण्यात आली आहे.
या योजनेचा सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. यावेळी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सांगर आंघोळकर, संतोष कांबळे, नगरसेविका माई ढोरे, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब चौगुले, जवाहर ढोरे, कामगार समिती सदस्य श्री.जयवंत शिंदे व बांधकाम कामगार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अनिल कांबळे यांनी कष्ट घेतले.