राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं करण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध बायोडिझेल विक्रीसंदर्भात कार्यवाही करण्याची प्रक्रिया जलद गतीनं वाढवण्याचे निर्देश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात राज्याच्या बायोडिझेल धोरणाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. राज्यात अवैध इंधन आणि बायोडिझेल विक्री रोखण्यासाठी विशेष मोहिम आखून त्यानुसार जिल्हा स्तरावर पथकं स्थापन करणं गरजेचं आहे. अवैध इंधन विक्रीमुळे केंद्र शासन आणि राज्यशासनाच्या महसूलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत केंद्र शासनाला पत्रव्यवहार करुन अवगत करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. बायोडिझेलचे अवैध उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सूचना त्यांनी यावेळी केली. राज्यातल्या बंदरांच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध बायोडिझेलची आयात, तसंच साठवणूक, पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढवलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.