स्वच्छ भारत सर्वेक्षणात यावर्षीही महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – गुलाबराव पाटील
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत मिशन – ग्रामीण, टप्पा -२ अंतर्गत, केंद्र स्तरावरुन राज्यात केल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात यावर्षीही महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते काल मंत्रालयात स्वच्छ भारत ग्रामीण सर्व्हेक्षण कार्यशाळेचं ऑनलाईन उद्घाटन करताना बोलत होते. २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातली ७७५ गावं हागणदारीमुक्त अधिक शौचालययुक्त घोषित केली आहेत. मार्च २०२२ पर्यंत १९ हजार ६२४ गावं हागणदारीमुक्त अधिक शौचालययुक्त घोषित करायची आहेत. त्यासाठी नियोजन करावं, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत राज्यातल्या एकूण ९ हजार ९७१ गावांचे प्रारुप आराखडे तयार केले आहेत. उर्वरीत आराखडे लवकर तयार करावेत, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभही काल गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी हातांची स्वच्छता महत्वाची आहे. म्हणून स्वच्छ हात धुवून आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.