कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढा – मुख्यमंत्री
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या, राज्यातल्या वाहतुकदारांच्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढू, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळानं आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची येथे भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. राज्यात शहरांमध्ये बस आणि ट्रक्ससाठी पुरेशा वाहनतळांची सोय उपलब्ध करून देण्याकरता, नगरविकास विभागाला सूचना दिल्या जातील. याकरता मोकळ्या जागांसाठी तसंच चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याकरता नियोजनही करू, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. यावेळी वाहतूक महासंघाच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्याही मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.