लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण कमी झालेले जिल्हे शोधून तिथे लशीचा पुरवठा करण्यावर लक्ष देण्याचं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांचे आरोग्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका बैठकीत लसीकरणाचा आढावा घेतला. लसीकरण मोहीम लवकरच एक अब्जाचा टप्पा ओलांडणार असल्याचं सांगून त्याबद्दल त्यांनी सर्व राज्यसरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचं अभिनंदन केलं. जिथे लस पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही तिथल्या वाहतूक किंवा साठवणीच्या अडचणींवर तोडगा काढावा, लसीकरण केंद्र वाढवावी, विशेषतः दुसरी मात्रा मिळण्यात अडचणी येत असल्याचं आढळलं असून प्राधान्याने यावर उपाययोजना करावी असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाविषयी आरोग्यमंत्रालयाने वेळोवेळी नियम लागू केले आहेत. त्यांचा आढावा घेऊन सुधारणा करायच्या असून राज्यसरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्याबाबत सूचना कराव्या असं आवाहन केंद्रानं केलं आहे.