मेरिटाईम कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस आणि चोरीला गेलेल्या, हरवलेल्या मोबाईलला ट्रॅक करणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन
मुंबई : दूरसंचार क्षेत्रासमोरील अडचणी सोडविण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले असून यासाठी कम्युनिकेशन पॉलिसीसह अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्याचे केंद्रीय दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते आज मेरिटाईम कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस तसेच सेंट्रल इक्युपमेंट आयडेंटिफिकेशन सिस्टीमद्वारे हरवलेल्या तसेच चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.
हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलच्या संचाचा शोध घेण्यासाठी सेंट्रल इक्युपमेंट आयडेंटिटी रजिस्टर तयार करण्यात आले आहे. यातील आयएमईआय नंबरवरून हरवलेल्या मोबाईलचा किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेता येणार आहे. हा प्रकल्प पथदर्शी स्वरूपात महाराष्ट्रात सुरु करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अंशुप्रकाश, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, नॅल्कोचे व्यवस्थापकीय संचालक पी.जे नाथ यांच्यासह महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री श्री. धोत्रे यांच्या हस्ते मेरिटाईम कम्युनिकेशन्सच्या व्हाईट पेपरचेही प्रकाशन करण्यात आले.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला अतिशय पारदर्शक पद्धतीने स्पेक्ट्रम लिलाव करण्यात येतील असे सूतोवाच करून श्री. प्रसाद म्हणाले की, केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणसाला शक्ती प्रदान केली आहे. त्यादृष्टीनेच सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित दोन महत्त्वाच्या सेवांचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. देशात १२० कोटी मोबाईल आहेत, १२३ कोटी आधारकार्ड आहेत, ७० कोटी जनता इंटरनेट वापरते. देशात मोबाईलवर गुगल सर्च करणारे गावकरी आहेत. ३३ कोटी प्रधानमंत्री जनधन खाते मोबाईल आणि आधारला जोडले गेले आहेत. जनधन-आधार आणि मोबाईल या “जॅम” नेटवर्किंगमधून ७ लाख ६० कोटी रुपये थेट गरिबांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. १ लाख ४४ कोटी रुपयांची गळती थांबली आहे. ५००० कोटी रुपयांहून अधिक शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ही सर्व डिजिटल यंत्रणा सामान्य माणसाच्या क्षमतांना वृद्धिंगत करणारी आहे. आजघडीला ९० कोटी बँक खाते आधारशी संलग्न झाले आहेत. देशाने जीएसटी साठी आणि आधार प्रणालीसाठी स्वत:चे माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. आयुष्यमान भारत सारख्या योजनेतही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर होत आहे. शिक्षण असेल किंवा अन्य कोणतेही क्षेत्र आज सर्वच क्षेत्रात “डिजिटल प्लॅटफॉर्म” चे महत्त्व वाढताना दिसत आहे.
डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. ते म्हणाले, नोव्हेंबर २०१६ मध्ये दरदिवशी ४ हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने होत होते. जुलै २०१९ मध्ये २.६५ कोटी दर दिवस इतके वाढले. डिजिटल मनी ट्रान्सफर चे सप्टेंबर २०१७ चे प्रमाण दरमहा ५३२५ कोटी रुपये होते ते वाढून जुलै २०१९ मध्ये दरदिवशी १.४६३ लाख कोटी इतके झाले. भारतीय जनता माहिती तंत्रज्ञानातून उपलब्ध होणाऱ्या सर्व डिजिटल सेवांचा आनंद घेताना दिसत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हरवलेल्या/ चोरीला गेलेल्या मोबाईलच्या ट्रॅकिंगसाठी पथदर्शी स्वरूपात महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पात महाराष्ट्र नेहमीप्रमाणे यशस्वी कामगिरी करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी नेल्को ने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या मेरिटाईम कनेक्टिव्हिटी सेवेमुळे सागरी क्षेत्रात ब्रॉडबँडद्वारे उत्तम दर्जाची संपर्क सेवा विकसित होणार असल्याचे व त्याचे लाभ शिपिंग क्षेत्रातील प्रत्येक घटकाला होणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्यमंत्री श्री. धोत्रे म्हणाले, सुलभ आणि सुरक्षित संवादासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुविधेने व्यापक दालन खुले केले आहे. राष्ट्रीय दूरसंचार नीती २०१८ द्वारे याला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवताना सुरक्षित,सुलभ आणि वेगवान सेवा देण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. यासाठीच्या विविध प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
उपक्रमांच्या यशस्वितेसाठीची आणि पूर्ततेसाठीची कटिबद्धता हे नेहमीच मुंबई आणि महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिल्याचे गौरवोद्गार काढतांना त्यांनी चोरलेल्या किंवा हरवलेल्या मोबाईल संचाचा शोध घेण्याच्या पथदर्शी प्रकल्पात महाराष्ट्र यशस्वी कामगिरी करून दाखवेल असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव श्री अंशुप्रकाश यांच्यासह उपस्थित इतर मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. पी.जे नाथ यांनी मेरिटाईम कनेक्टिव्हिटी सर्व्हिेसेसची माहिती देणारे सादरीकरण केले.