प्रधानमंत्री आयुष्मान भारत अभियानाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांवर ९० ते १०० कोटीं रुपये खर्च करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियान सुरू केलं आहे, या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान ९० ते १०० कोटीं रुपयाचा खर्च केला जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. ते आज नवी दिल्ली इथं या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अभियानांतर्गत १३४ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या जिल्हास्तरावर मोफत उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. या अंतर्गत कंटेनरवर आधारित रेल्वेमध्ये २ रुग्णालयं सुरू केली जाणार आहेत. देशाच्या ज्या कोपऱ्यात वैद्यकीय सुविधेची गरज असेल तिथे या रेल्वे नेल्या जातील आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील, असं ते म्हणाले. यामध्ये एका रेल्वेत २२ कंटेनर असतील आणि त्यात १०० खाटांची सुविधा उपलब्ध असेल. दक्षिण आशियामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची सुविधा उपलब्ध होणार आहे.