Site icon साप्ताहिक एकच ध्येय

थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाची अंमलबजावणी; मुंबई ठाण्यातील ६ दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार

मुंबई : थेट लाभ हस्तांतरण (DBT- Cash) प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई ठाण्यातील 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होणार आहे.

थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अ परिमंडळातील आझाद मैदान आणि महालक्ष्मी या दोन रास्तभाव दुकानांसह इतर परिमंडळातील प्रत्येकी एका दुकानाचा समावेश करुन एकूण 6 दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीकरिता हा प्रकल्प राबविण्यात येईल. तसेच या प्रकल्पाबाबतच्या मूल्यमापनानंतर पुढील सहा महिन्याच्या कालवधीकरिता वाढविण्याचा विचार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट रास्तभाव दुकाने व सदर प्रकल्प ऑक्टोबर 2019 पासून राबविताना J-PAL या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सदर रास्तभाव दुकानातील DBT (Cash) चा पर्याय स्वीकारलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती रक्कम अदा करण्यात येणार आहे.

आझाद मैदान येथील  1/A/106 दुकान आणि  महालक्ष्मी येथील 11/A/61 दुकान ‘अ’ परिमंडळात येत असून यामध्ये प्रति माह प्रति व्यक्ती 112.39 रुपये रक्कम मिळणार आहे. सांताक्रूझ येथील 23/D/114 दुकान ‘ड’ परिमंडळात येत असून यामध्ये प्रतिमाह प्रति व्यक्ती 190.00 रुपये रक्कम मिळणार आहे. घाटकोपर येथील 34/E/183 दुकान ‘इ’ परिमंडळात येत असून यामध्ये प्रतिमाह प्रति व्यक्ती 140.00 रुपये रक्कम मिळणार आहे. बदलापूर येथील 46/F/72 दुकान ‘फ’ परिमंडळात येत असून यामध्ये प्रतिमाह प्रति व्यक्ती 125.00 रुपये रक्कम मिळणार आहे. कांदिवली येथील 28/G/166 दुकान ‘ग’ परिमंडळात येत असून यामध्ये प्रतिमाह प्रती व्यक्ती 165.00 रुपये रक्कम मिळणार आहे.

या प्रकल्पाची पुढील कार्यवाही Abdul Latif Jameel Poverty Action Lab South Asia (J-PAL) या संस्थेतर्फे 28 जून 2018 रोजी राज्य शासनाबरोबर झालेल्या सामंजस्य करारानुसार करण्यात येणार आहे.

Exit mobile version