Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी मद्यसाठा वाहनासह जप्त

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे.

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, श्री. कांतिलाल उमाप व संचालक उषा वर्मा (दक्षता व अंमलबजावणी), राज्य उत्पादन शुल्क, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, ठाणे विभाग सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, श्री. वाय.एम. पवार यांचे आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक श्री. रविंद्र आवळे व उपअधीक्षक श्री. दादासाहेब दराडे राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकास दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी बटकणंगले, जांभुळवाडी रोडवरून काही जणांकडून बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली, त्यानुसार या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना रात्री 12.00 वाजण्याच्या सुमारास बटकणंगले ता. गडहिंग्लज हद्दीत जांभुळवाडीकडे जाणाऱ्या रोडलगत कच्च्या पाणंद रोडवर एक सहाचाकी टाटा KA-25-C-0701 ट्रक थांबलेला व संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या ठिकाणी जावून छापा घातला असता तेथील व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून तपासणी केली असता हौद्यामध्ये व हौद्याच्या वरती हुडाला असलेल्या पत्र्याच्या प्लेटाची बारकाईने पाहणी करताना वर चोरकप्पा केल्याचे दिसून आले. पत्र्याच्या प्लेटा काढून पाहिले असता कप्प्यामध्ये विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य असल्याचे आढळले.  आतमध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे 750 मिलीचे बॉक्स मिळून आले. संशयित आरोपीत निखील उर्फ बल्या दत्ता रेडेकर, मारुती इराप्पा पाटील, भरमु यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

छाप्यात वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे इम्पेरियल ब्ल्यु रिझर्व सेव्हन इम्पेरियल ब्ल्युरॉयल स्टॅग, गोल्डन एस ब्ल्यु व्हिस्को तसेच गोल्ड ॲन्ड ब्लॅक XXX रम व ग्रीन अॅपल वोडका या ब्रँडच्या 750 मिली व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले एकुण 325 बॉक्स व टुबर्ग स्ट्रॉग बिअरचे 500 मिलीचे टिनचे 05 बॉक्स असे एकुण 330 बॉक्स इतके मद्य मिळून आले असून त्याची बाजारभावानुसार एकूण रु.21,40,200/- इतकी किंमत असुन गुन्ह्यांत मिळून आलेले वाहन यांची मिळून 10,00,000/- इतकी किंमत असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रु.31,40,200/- इतकी आहे.

गुन्ह्यांतील पसार आरोपी इसमांचा शोध सुरू असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक श्री.संभाजी बरगे यांनी सांगितले. कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक संजय मोहिते, विजय नाईक, जवान सर्वत्री संदीप जानकर सागर शिंदे, सचिन काळेल. मारुती पोवार, राजु कोळी, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.

Exit mobile version