Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिनोम सिक्वेसिंगच्या चौथ्या चाचणीनुसार कोविड लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्ती अधिक सुरक्षित

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्ती अधिक सुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. कोविड-१९ विषाणूचं जनुकीय सूत्र निश्चित करणाऱ्या म्हणजेच ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग’ करणाऱ्या बृहन्मुंबई महापालिकेच्या यंत्रणेनं आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. मुंबईतल्या २८१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास केल्यावर त्यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ७५ टक्के तर ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे २५ टक्के रुग्ण आढळून आल्याचं हिंदुस्थान समाचार वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. मुंबई महापालिकेनं २८१ जणांमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेसिंग चाचणी नुसार कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या; केवळ ८ जणांना; तर लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या केवळ २१ जणांनाच रुग्णालयात दाखल करावं लागलं. यापैकी प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची कोणालाही गरज लागली नाही. तसेच मृत्यूही झालेला नाही, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. याउलट, कोविड लसीची एकही मात्रा न घेतलेल्या ६९ नागरिकांना मात्र कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलं. त्यातल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. चौघांना प्राणवायू पुरवठा करावा लागला. आणि तिघांना अतिदक्षता उपचार द्यावे लागले. यामध्ये चार जणांचा मृत्यूही झाला. मृत्यू झालेले चारही रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि यातल्या दोघांना दीर्घकालीन आजार होते. या चारही रुग्णांना ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झाली होती आणि हे चारही जण कोविडची लक्षणं दिसल्या नंतर २ ते ५ दिवस उशीरानं रुग्णालयात दाखल झाले. याचाच अर्थ असा की कोविड लस घेणाऱ्या आणि कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्या व्यक्तीला; कोरोना विरूद्धचं संरक्षण तर मिळतंच आणि जर कोविडची बाधा झालीच तरी त्याची तीव्रता अत्यंत कमी असते. म्हणूनच सर्व पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेणं अत्यावश्यक असून त्याचबरोबर कोविड-१९ प्रतिबंधक नियमांचं कठोर पालन प्रत्येकानं करणं नितांत गरजेचं आहे.

Exit mobile version