मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत करार प्रक्रिया पूर्ण
मुंबई : महाराष्ट्रातील ग्रंथचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्याम जोशी यांचे बदलापूर येथील प्रसिद्ध ग्रंथालय राज्य मराठी विकास संस्थेकडे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय म्हणून सुपूर्द करण्यात आले. त्यानुसार राज्य मराठी विकास संस्था आणि श्याम जोशी यांच्यामध्ये मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करार करण्यात आला.
या ग्रंथसंग्रहाच्या हस्तांतरणासाठी उभयपक्षी मान्य केलेल्या रकमेपैकी २५ लाख रुपयांचा धनादेश विनोद तावडे यांच्या हस्ते श्याम जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
बदलापूर येथील हे संदर्भ ग्रंथालय समृद्ध करण्यात महाराष्ट्रातील ग्रंथचळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्री. श्याम जोशी यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांनी आयुष्यभर प्राणपणाने जपलेला ग्रंथसंग्रह राज्य मराठी विकास संस्थेला हस्तांतरित करण्यास संमती दर्शवली आहे. त्यानुसार आज हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
लोकभाषा, व्यवहारभाषा आणि प्रशासकीय भाषा अशा तीनही क्षेत्रात भाषेचा विकास व्हावा, यासाठी राज्य मराठी विकास संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार संस्थेची प्रगती वेगाने होण्यासाठी विविध उपयुक्त निर्णय संस्थेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी घेतले आहेत. पुस्तकांचं गाव, वाचनयात्रा प्रकल्प, मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन, अमराठी भाषकांसाठी मराठी अध्यापनाची साधने विकसित करणे ही त्यातील निवडक उदाहरणे. वाचनसंस्कृती जोपासतानाच अभ्यासकांसाठी सुयोग्य वातावरण आणि संदर्भसाधने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेचे मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या हस्तांतरणासाठी प्रसिद्ध साहित्यिक श्री. भारत सासणे, ग्रंथपाल व साहित्यिक श्रीमती मीना वैशंपायन, श्री. प्रदीप कर्णिक आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळ सदस्य श्रीमती श्यामा घोणसे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सदर ग्रंथसंग्रहाविषयी नोंदवलेली निरीक्षणे अतिशय महत्त्वाची आहेत.
श्री. श्याम जोशी यांनी उभारलेल्या या ग्रंथालयामागे एक विशिष्ट दृष्टी आहे. मराठीतील वाङ्मयीन ठेव्याची/ ग्रंथसंपदेची व्याप्ती, मराठी भाषेचे विविध आयाम ग्रंथरूपाने दाखविणे, नवीन पिढीवर वाचन, लेखन संस्कार करणे हे उद्देश श्री. जोशींनी आरंभापासूनच ठेवले आहेत. या ग्रंथालय उभारणीसाठी श्री. जोशी यांनी केलेले परिश्रम उदा. ग्रंथांचा शोध घेणे, ते प्रत्यक्ष मिळविणे, त्यांची प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेऊन त्यावर बांधणी आधी संस्कार करणे यासाठी केलेले कष्ट अमूल्य आहेत.
विद्यापीठीय पातळीवर अभ्यास करताना मराठी भाषा, व्याकरण, बोली, लिपी, साहित्य वाङ्मयेतिहास, संस्कृती, समाजशास्त्र इत्यादी आंतरशाखीय अभ्यासाच्या या दिशांनी संशोधन, लेखन, संपादन व्हावे यादृष्टीने ग्रंथालयाचा संग्रह आवश्यक असतो. त्या दृष्टीने हे ग्रंथसंग्रहालय समृद्ध आहे. तरीही राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने या संग्रहाचे मूल्यांकन करण्याचा समितीने प्रयत्न केलेला आहे.
या ग्रंथालयाला, ग्रंथालय शास्त्रानुसार अभिप्रेत असलेले ग्रंथसंग्रहाचे आणि ग्रंथ विस्तार-विकासाचे धोरण आहे. दोलामुद्रिते/ अतिदुर्मिळ ग्रंथ (सन १८०० ते १८६७), दुर्मिळ ग्रंथ (१८६८ ते १९२०), मौलिक ग्रंथ (संदर्भग्रंथ, कोशवाङ्मय, सूचीवाङ्मय), छायाप्रती, हस्तलिखिते आणि विविध नियतकालिके (वाङ्मयीन नियतकालिकांचा उत्कृष्ट बांधणीसह संपूर्ण संच, लोकप्रिय नियतकालिकांचा संग्रह, दिवाळी अंकांचा संग्रह), दुर्मीळ कात्रणांचा संग्रह अशी वर्गवारी ध्यानात घेता हा संग्रह अभ्यासक, विचक्षण वाचक आणि मराठीच्या हित- संवर्धनासाठी खूप आवश्यक आहे. संबंधित समितीने ह्या साऱ्या या बाबी ध्यानात घेऊन प्रस्तुत ग्रंथात संग्रहाचे मूल्यांकन केलेले आहे आणि सदर संग्रह राज्य मराठी विकास संस्थेने हस्तांतरित करून घेण्यास सहमती दर्शवली आहे.
आगामी ५ वर्षांच्या कालावधीसाठी, बदलापूर येथील सध्याच्या जागीच हे ग्रंथालय कार्यरत असेल. तेथे ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि सहायक अशी पदेही भरली गेली आहेत. हे संदर्भ ग्रंथालय साहित्य आणि भाषेच्या अभ्यासकांसाठी नेहमीच उपलब्ध असेल, तेथे येणाऱ्या अभ्यासकांना सुयोग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे यापुढे सर्व मराठीप्रेमी मंडळी आणि अभ्यासकांनी या संदर्भ ग्रंथालयाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले आहे.