Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते INS विशाखापट्टनम ही विनाशिका भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात भारत केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तर जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जहाजांची निर्मिती करू लागेल असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. INS विशाखापट्टणम ही विनाशिका आज भारतीय नौदलाच्या सेवेत प्रत्यक्षात रुजु झाली. त्यानिमीत्त मुंबई इथं झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.INS विशाखापट्टणम ही विनाशिका १६३ मीटर लांबीची असून, आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असल्यानं, जगातली आधुनिक क्षेपणास्त्ररोधी विनाशिकांपैकी एक ठरली असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. या विनाशिकेची संरचनात्मक संकल्पना पूर्णतः भारतीय आहे, तर विनाशिकेसाठीची ७५ टक्के यंत्रसामग्री भारतीय बनावटीची आहे. या विनाशिकेमुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक भक्कम होईल असं ते म्हणाले. कोरोना काळातही या विनाशिकेच्या विविध चाचण्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. विविध उपक्रमांच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातली भारतीय बनावटीच्या विविध साधनं आणि उपकरणांच्या निर्मितीची प्रक्रिया सातत्यपूर्ण रितीनं सुरु असल्याबद्दलही त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. गेल्या काही काळात भारतीय नौदलात दाखल झालेल्या ४१ पैकी ३९ जहाजं आणि पाणबुड्यांची निर्मीती भारतातल्याच जहाज निर्मिती व्यवस्थापनांमध्ये झालेली आहे, यातून नौदलाची आत्मनिर्भर भारतासाठीची वचनबद्धता दिसून येते असं ते म्हणाले.

Exit mobile version