Site icon साप्ताहिक एकच ध्येय

धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार

मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार करण्यात आला.

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रु.1000.00 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संदर्भातील राबवायच्या सर्व योजनांचे निकष, अटी शर्ती, आर्थिक तरतुदी आणि योजना राबवणारे विभाग असा शासन निर्णयही जाहीर झाला आहे.

अमरावती विभागात डॉ. संजय कुटे आणि कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि  आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कामगार विभागाच्या लाभ वाटप मेळाव्यामध्ये या शासन निर्णयाबद्दल धनगर समाज बांधवांना माहिती देण्यात आली. यावेळी धनगर बांधवांनी डॉ. संजय कुटे यांना मानाची धनगर पगडी, घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सन्मान केला.

पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुल बांधकाम, मेंढ्या वाटप, मेंढी पालनासाठी बंदिस्त अर्ध बंदिस्त जागा विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, पावसाळ्यातील चार महिन्यांकरिता मेंढी पालनाकरिता चारा अनुदान, महिला सहकारी संस्थांसाठी 10 शेळ्या व एक बोकड वाटपाची योजना राबविण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमार्फत चालू योजनांद्वारे धनगर समाजातील घटकांना लाभ मिळत असलेल्या 16 योजना वगळून आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण 13 योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जाहीर केलेल्या शासन निर्णयात धनगर समाजातील बांधवांना घर बांधणे, युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षेसाठी शुल्कात आर्थिक सवलत लागू करणे, सैन्यात भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देणे, गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्माण करणे, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे इत्यादी योजनचे शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना

1 :-  भटक्या जमाती-क या प्रवर्गातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त, बंदिस्त,मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे.

2 :-  वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या  स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे.

3 :-  भटक्या जमाती-क या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश देणे.

4 :-  भटक्या जमाती-क या प्रवर्गातील ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10,000 घरकुले बांधून देणे.

5 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध नसलेल्या योजना / कार्यक्रम राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना.

6 :-  राज्यातील भटक्या जमाती-क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या सहकारी सूत गिरण्यांना  भागभांडवल मंजूर करणे.

7 :-  केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे.

8 :-  भटक्या जमाती-क या प्रवर्गातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराईकरिता जून ते सप्टेबर या 04 महिन्यासाठी चराई अनुदान देणे.  (प्रायोगिक तत्वावर)

9 :-  भटक्या जमाती-क या प्रवर्गातील होतकरु बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी प्रशिक्षण.

10 :-  भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू करणे.

11 :- भटक्या जमाती-क या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे.

12 :- ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालन संकल्पनेंतर्गत भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील जमातीसाठी 75 टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी (सीएआरआय- मान्यता प्राप्त) प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य.

13 :-  नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी भटक्या जमाती-क प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणे.

Exit mobile version