Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परीवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत ही हंगामी वेतनवाढ असेल. अहवाल आल्यानंतर समितीनं विलिनीकरणाला अनुकूलता दर्शवली तर पुन्हा वेतनवाढ दिली जाईल, असं परब यांनी सांगितलं. संपकरी कामगार संघटनांच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संप अधिक न ताणवता, तो मागे घ्यावा, असं आवाहन परब यांनी यावेळी शिष्टमंडळाला केलं.  दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आझाद मैदानात अजूनही सुरू आहे. या आंदोलनात आज नाराजी नाट्य दिसून आलं. आंदोलनाच नेतृत्व करणारे कामगार नेते सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे आज नाराज झाल्यानं आझाद मैदानातून निघून जात होते. मात्र त्यांना कामगारांनी अडविले. त्यानंतर दोघेही आज 11 वाजता समितीच्या होणाऱ्या बैठकीसाठी जाण्यास तयार झाले. अंतरिम पगारवाढ या बाबत या बैठकीत चर्चा होणार असून त्याबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलय. येत्या गुरुवारी एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Exit mobile version