Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई (वृत्तसंस्था) : ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे. ते काल मंत्रालयात ठिबक सिंचन असोसिएशनसोबत विविध विषयांवर आय़ोजित बैठकीत बोलत होते. राज्य शासनानं शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान, आणि इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदाना व्यतिरिक्त 30 टक्के पूरक अनुदान कमाल 5  हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास मान्यता दिली आहे. त्याचा लाभ राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या फळबागेसाठी ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर पिकांनाही ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ठिबक सिंचन साहित्य निर्मिती करणारे उत्पादक, विक्रेते यांनीही त्याची निकड शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन भुसे यांनी केलं. राज्यात आतापर्यंत 25 लाख 72 हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेलं असून या नवीन योजनेमुळे त्यामध्ये निश्चितपणे वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version