ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना प्रवासाआधी ७२ तास कोविड चाचणी करुन घ्यावी लागेल तसंच ती निगेटीव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागेल. भारतात येण्याआधीच्या दोन आठवड्यांच्या प्रवासाचा तपशीलही सादर करणं अनिवार्य असेल. कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकांना भारतात आल्यावर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागेल आणि तिचा अहवाल येईपर्यंत विमानतळावरच थांबावे लागेल. चाचणी निगेटीव्ह आली तर ७ दिवस अलगीकरणात राहून पुन्हा चाचणी करुन घ्यावी लागेल. दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरही अजून सात दिवस विलगीकरणात राहावं लागेल असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. धोका नसलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांना विमानतळावर थांबावे लागणार नाही. मात्र १४ दिवस आरोग्य देखरेखीखाली राहावं लागेल. समुद्रमार्गे भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी हीच नियमावली लागू असेल. ५ वर्षांखालील मुलांना यातून सवलत देण्यात आली आहे. परंतु त्यांच्यात कोविडची लक्षणं आढळली तर त्यांना नियमानुसार उपचार घ्यावे लागतील असं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.