Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची हजेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्राच्या अग्नेय भागात चक्रीवादळाची परिस्थीत निर्माण झाल्याच्या प्रभावानं राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाची परिस्थिती आजही कायम आहे. अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे हवेतला गारठा अचानक वाढल्यानं आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची भितीही व्यक्त होत आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरात काल रात्रीही पावसाची संततधार कायम होती. या भागांत आज सकाळी पावसानं काहीशी उसंत घेतली होती. मात्र ढगाळ वातावरण कायम असून, अधूनमधून पावसाची रिपरीप सुरु आहे. अवकाळी पावसानं या भागांतलं तापमान अचानक घसरून गारठा वाढला आहे.

सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसानं आज सकाळी पुन्हा जोर धरला. आंबा आणि काजुला मोहोर धरण्याच्या काळात पाऊस पडल्यानं बागायतदार धास्तावले आहेत, तर अनेक ठिकाणी कापणी केलेली भात आणि नाचणीची पिकं भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नाशिक जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या द्राक्ष आणि कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कापूस, कांदा भिजून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

सांगली काल रात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. आजही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, पिकं वाचवण्यासाठी फवारणीचा खर्च वाढून, उत्पादन खर्चही वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड कामगारांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यानं, संसार पाण्याखाली गेले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, बिडकीन, खुलताबाद परिसरात पाऊस सुरु आहे. औरंगाबाद शहरातही रिमझिम पाऊस सुरु असून, थंडीचा कडाका वाढला आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, कापूस, तसंच मूग, उडीद, तूर, तीळ, बाजरी, मका या पीकांचं मोठं नुकसान व्हायचा धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version