नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ कोविंद यांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. तसेच राष्ट्रपतींना त्यांनी १६ वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारसही केली आहे.
नवीन सरकारच्या स्थापनेपर्यंत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने काम सुरू ठेवावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या भेटी आधी पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या लोकसभेचा कालावधी हा ३ जून पर्यंत आहे. आता १७ व्या लोकसभेची स्थापना ३ जूनच्या आधी केली जाणार आहे असेही समजते आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील अशीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. २९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादला जाणार आहेत तिथे ते त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतील असेही समजते आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या निवडणुकीचे आकडे मागे टाकून अभूतपूर्व यश मिळवलं. एकट्या भाजपाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.