Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सफाई कामगारांचे प्रश्न सोडविणार – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे

मुंबई : सफाई कामगारांच्या प्रश्नांवर शासनामार्फत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री  डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिले आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

डॉ.खाडे पुढे म्हणाले, सफाई कामगारांचे हक्क त्यांना मिळतील. मुस्लीम मेहतर, भंगी, वाल्मिकी या समाजातील सफाई कामगार या पदांवर काम करीत असलेल्या सर्व बांधवांच्या आरोग्याचा, निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणेला सूचना देण्यात येतील. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशी सर्व सफाई कामगारांना लागू करण्याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी काही अडचणी असल्यास त्या दूर करण्यात येतील.

यावेळी बोलताना श्री.वाघमारे यांनी विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध शासन निर्णयांची माहिती दिली. कंत्राटी तसेच रोजंदारीने काम करणारे जे कर्मचारी स्थायी झाले असतील आणि त्यांच्या नोकरीला 25 वर्ष पूर्ण झाले असतील त्यांनाही  लाड -पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात येत आहेत. तसेच नगर विकास विभागामार्फत सफाई कामगारांसाठी श्रम साफल्य ही घरांची योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Exit mobile version