संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना देशाचं अभिवादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त, या हल्ल्यापासून संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. संसद भवनात आज झालेल्या आदरांजली कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि इतर सदस्यांनी या सुरक्षा जवानांना अभिवादन केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर या सुरक्षा जवानांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी देश या जवानांचा सदैव ऋणी राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. मानवता आणि जागतिक शांततेला दहशतवादाचा धोका आहे. त्यामुळे दहशतवादाला पराभूत करण्यासाठी सर्व देशांनी एकजूट राहीलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर, या जवानांनी केलेली देशाची सेवा आणि त्यांचा त्याग प्रत्येक नागरिकाला नेहमी प्रेरणा देत राहील, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.