मुंबई : बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीर सैनिकांचे स्मरण केले आहे. “बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या 1971 च्या ऐतिहासिक युद्धात भारतानं, 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचा आज सुवर्णमहोत्सव. भारतीय सैन्यासमोर त्यादिवशी नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केलं होतं. भारतीय सैन्यासाठी, तमाम देशवासियांसाठी तो गौरवक्षण अनुभवण्याचं भाग्य प्राप्त करुन देणाऱ्या देशाच्या वीर सैनिकांना, त्यांच्या शौर्याला, त्यागाला कृतज्ञतापूर्वक वंदन. देशाच्या तत्कालिन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या साहसी, कुशल, दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळेच तो ऐतिहासिक विजय शक्य झाला. त्याबद्दल त्यांचंही कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन. देशाच्या वीर सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश कायम भक्कमपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त देशवासियांना बांगलादेश मुक्ती संग्राम सुवर्णमहोत्सवी विजयदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.