Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जापनीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास

मुंबई : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख एकशे तेवीस मुलांना ही लस दिली जाणार आहे.

जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण जानेवारी महिन्यात केले जाणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, नगरविकास विभाग उपसचिव विद्या हम्पया, ग्राम विकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रा. भा. गायकवाड, सल्लागार डॉ. राजीव कुमार, डॉ. राज जोटकर आदी उपस्थित होते.

डॉ. व्यास यांनी सांगितले की, जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वरील चार जिल्ह्यांतील सर्व पात्र मुलांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत.

डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेसाठी केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. डॉ.सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

बैठकीस कक्ष अधिकारी सा. दा. मुकदाडवार, आदिवासी विभागाचे कक्ष अधिकारी स. श्री. खांडेकर, शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version