पुणे : महाराष्ट्राच्या शब्द, सूर आणि अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेल्या सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे या त्रिमुर्तींच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी ‘लोकराज्य’चा शताब्दी महोत्सव हा विशेषांक उपयुक्त आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ‘लोकराज्य’ कायमच आघाडीवर असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा लोकराज्यच्या सप्टेंबरच्या विशेषांकाचे अतिथी संपादक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
सर्जनशील संगीतकार सुधीर फडके, थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर आणि अष्टपैलू कलावंत पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘लोकराज्य’चा सप्टेंबर महिन्याचा अंक ‘शताब्दी महोत्सव’ विशेषांक म्हणून काढण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन या विशेषांकाचे अतिथी संपादक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, लोकराज्यच्या शताब्दी महोत्सव या विशेषांकात सुधीर फडके, ग.दि.माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे या त्रिमुर्तींच्या जन्मशताब्दी निमित्त वेगवेगळ्या अभ्यासकांनी लिहिलेल्या लेखांचा आणि आठवणींचा समावेश आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून या दिग्गजांच्या स्वभावाच्या, कार्याच्या व योगदानाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो. हा विशेषांक आजच्या तरूण पिढीला या मान्यवरांची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत घडलेल्या विविध घडामोडींचे चित्रण योग्यरित्या करण्याचे काम लोकराज्य या शासनाच्या मासिकाने कायमच केले आहे. त्यामुळे एका अर्थाने राज्याच्या सांस्कृतिक वाटचालीचा लोकराज्य हा आरसाच आहे. या महिन्याच्या लोकराज्यच्या अंकाचा अतिथी संपादक म्हणून काम करण्याचे भाग्य मला लाभले या बद्दल मला विशेष अभिमान असल्याचे सांगत या विशेषांकाचे वाचक निश्चितच स्वागत करतील असा विश्वास डॉ. मोरे यांनी व्यक्त केला.
उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, नेहमी प्रमाणेच लोकराज्यचा ‘शताब्दी महोत्सव’ हा विशेषांक संग्राह्य असून सर्व पुस्तकविक्रेते आणि वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. लोकराज्यचे वर्गणीदार होण्यासाठी वाचकांनी जिल्हा माहिती कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.