Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विदर्भात काल अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट, रब्बी पिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात काल संध्याकाळनंतरही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, लाखोरी, जवस, मोवरी, तूर यांसह रब्बी पिकं आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी  मागणी शेतकरी करत आहेत. भंडारा जिल्ह्यात काल सर्वदूर पावसानं हजेरी लावली. तुमसर आणि मोहाड़ी तालुक्यात ग्रामीण भागात गारपीट झाली. धुसाळा नवेगाव इथं वीज कोसळल्यानं एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. गोंदियात गोरेगाव, तिरोडा, गोंदिया, आमगाव या तालुक्यांना गारपिटीनं झोडपलं.चंद्रपूरमध्ये बल्लारपूर, नागभिड, वरोरासह काही तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकरी धास्तावले आहेत. जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यात काही भागात बोराच्या आकाराच्या गाराही पडल्या. भोकरदन, जाफाराबाद, घनसावंगी, बदनापूर तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात वालसावंगी इथं वीज कोसळल्यानं एक बैल दगावला.हवामान विभागानं आजही विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

Exit mobile version