राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडमधला प्रत्येकी एक रुग्ण आहे. मुंबईतल्या १९० रुग्णांपैकी १४१ जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. यापैकी ९५ जणांना कुठलीही लक्षणं नाहीत, ७ जणांना मध्यम तर ३९ जणांना सौम्य लक्षणं आहेत. १९० पैकी ९३ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, तर ३ जणांनी लसीची एक मात्र घेतली आहे. यामुळं राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४५० झाली आहे. त्यापैकी १२५ रुग्णांना कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आलंय. राज्यात काल कोरोनाच्या ५ हजार ३६८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १ हजार १९३ रुग्ण बरे झाले. २२ कोरोना बाधितांच्या मृत्यूमुळं राज्याचा मृत्यूदर २ पूर्णांक १२ टक्के झाला आहे. सध्या राज्यात सुमारे १ लाख ३३ हजार ७४८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, तर १ हजार ७८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत आणि १८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत काल कोरोनाचे ३ हजार ६७१ रुग्ण आढळून आले, तर ३७१ रुग्ण बरे झाले. काल मुंबईत एकही रुग्णाचा कोरोनामुळं मृत्यू झाला नाही.