मुंबई (वृत्तसंस्था) : अँटिन्जन चाचणी पॉझिटिव्ह आली, तर आरटी पीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. वाढत्या रुग्णसंख्येवर आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून कोरोना बाधित रुग्णवाढीचा दर दुप्पट झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गर्दी कमी करणं, संसर्ग टाळणं, मुखपट्टी वापरणं हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं विद्यालयांबरोबर आता मुंबईतल्या महाविद्यालयं देखील येत्या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या लॉकडाऊनचा विचार नसून कडक निर्बंध कडक लागू केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बाधित रुग्णांचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला असून घरगुती विलगीकरणासाठी प्रशासनानं नव्यानं मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.