Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन

मुंबई :  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ घेत आहेत.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे या योजनेतील काही कलाकारांची अतिरिक्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे  कलाकारांनी स्वत:चा आधार क्रमांक, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक ही माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. राज्यातील मानधन योजनेतील सर्व कलाकारांनी तपशीलवार वैयक्तिक माहिती 8424920676 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठविण्यात यावी. याबाबत माहितीची एक प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी / गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष कागदपत्रांच्या स्वरूपात सादर करावी. यामुळे मानधन धारकांना मानधन विषयक घडामोडी व इतर सर्व माहिती मेसेज द्वारे देता येईल.

तसेच मानधन योजनेअंतर्गत काही कलाकारांना मानधन मिळत नाही. अशा आशयाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मानधन न मिळण्यामागील कारणे म्हणजे, बँकेचा आयएफएससी कोड न देणे किंवा चुकीचा देणे, हयातीचा दाखला न देणे, चुकीचा बँक क्रमांक देणे, वारसाची नोंद न करणे इत्यादी आहेत. त्यामुळे ज्या साहित्यिक व कलाकारांना मानधन मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यांनी आपली सर्व माहिती संचालनालयाकडे वरील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावी, असे  आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत कलाकारांची व साहित्यिकांची सर्व माहिती ३१ जानेवारीपर्यंत संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक असल्याने सर्व कलाकार व साहित्यिक यांनी  ३१ जानेवारी २०२२ पर्यंत आपली माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी / गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी. अशी माहिती ३१ जानेवारीपर्यंत न पाठविल्यास मार्च २०२२ चे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.

याबाबतचे विहित नमुन्यातील अर्ज सर्व पंचायत समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहेत. वृद्ध साहित्यिक व कलावंतानी मानधन योजना माहिती अद्ययावतीकरणासाठी 1) कलाकाराचे छायाचित्र, 2) कलाकाराचे नाव, 3) स्वतः की वारस, 4) पत्ता, 5) निवड वर्ष, 6) कलाप्रकार, 7) आधार क्रमांक, 8) बँकेचे नाव व शाखा, 9) बँक खाते क्रमांक, 10) आय एफ एस सी क्रमांक, 11) पॅन कार्ड क्रमांक या विहित नमुन्यात अर्जासाठी कागद पत्रांची पूर्तता करुन आपली माहिती अद्ययावत करुन पाठवावी, असे सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Exit mobile version