Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई किनारा रस्ता प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱया या प्रकल्पाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे, ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणाऱया पहिल्या बोगद्याचे खणन आज (दिनांक १० जानेवारी २०२२) पूर्ण झाले. त्याप्रसंगी आयोजित ‘ऑनलाईन’ समारंभात मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे बोलत होते.

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती मीनल पटेल हे देखील दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे यावेळी सहभागी झाले होते. तर मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आदी मान्यवर प्रत्यक्ष स्थळी म्हणजे स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथे उपस्थित होते. तसेच, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. अजय राठोर, संचालक (भूसंपादन) श्री. अनिल वानखडे, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता) श्री. विजय निघोट यांच्यासह कंत्राटदार एल ऍण्ड टी यांच्या वतीने प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री. संदीप सिंग, बोगदा बांधकाम व्यवस्थापक श्री. संतोष सिंग, सल्लागार कंपनी मेसर्स यूशीन कन्सल्टंटच्या वतीने बोगदा बांधकाम व्यवस्थापक श्री. नॅमकाक चो हेही उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे संबोधित करताना म्हणाले की, मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट व त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. समुद्राखालून दोन टोकं जोडण्याचे काम करण्यात मावळा संयंत्र यशस्वी झाले आहे. किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्नं आहे. फक्त रस्ता बांधून न थांबता त्याच्या भोवती रमणीय व प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. मात्र महानगरपालिकेने ही आव्हाने स्वीकारुन मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य व पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याचे खणन आज पूर्ण झाले असून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काम आत्यंतिक कठिण स्वरुपाचे असून ते यशस्वीरित्या वर्षभराच्या आत पार पाडणे, ही विक्रमी स्वरुपाची कामगिरी आहे. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला होता. आता दुसऱया बोगद्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये सुरु होईल. केवळ बोगदाच नव्हे तर संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याचा विश्वास आहे. मुंबईकरांचे राहणीमान सुखकर करण्याच्या दृष्टीने अर्थात इज ऑफ लिविंगसाठी विविध कामे मुंबई महानगरात सुरु आहेत. गोरेगाव-मुलूंड जोडरस्ता, पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल), मुंबई मेट्रो या सर्व प्रकल्पांसह मुंबई कोस्टल रोडमध्ये देखील महानगराचा विकास पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे, असेही श्री. आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महानगरपालिकेने जे जे ठरवले, ते सर्व प्रकल्प पूर्ण करुन दाखवण्याची आमची परंपरा आहे आणि किनारा रस्ता त्याला अपवाद नाही. फक्त देशात नव्हे तर जगात देखील हा प्रकल्प नावाजला जाईल, अशा रितीने पूर्ण करुन लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल करु. टाळेबंदीच्या काळातही एकही दिवस या प्रकल्पाचे काम थांबले नाही आणि इतिहासात नोंद होण्याजोगी कामगिरी करुन हा प्रकल्प वेगाने पुढे सरकतो आहे, असे महापौरांनी सांगितले. पक्षप्रमुख पदी असताना श्री. उद्धवजी ठाकरे यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती आणि आता मुख्यमंत्री रुपाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या पाठबळाने हा प्रकल्प साकारतो आहे. त्यासाठी, संपूर्ण मुंबईकर जनतेच्या वतीने महापौर या नात्याने, मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदयांना धन्यवाद देत असल्याचे महापौरांनी अखेरीस नमूद केले.

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी पहिल्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता आणि त्यास वर्ष होण्यास एक दिवस शिल्लक असताना म्हणजे ३६४ दिवसांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ही विक्रमी कामगिरी असून संपूर्ण प्रकल्पाचे कामही वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. चहल यांनी दिला.

तत्पूर्वी, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते पूजन व घंटानाद करण्यात आले. त्यानंतर ‘मावळा’ या बोगदा खणन संयंत्र (टीबीएम) ने बोगद्यातून बाहेर येत ‘ब्रेक थ्रू’ पूर्ण केला. दरम्यान, कोविड संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता, हा कार्यक्रम पूर्णपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती स्मिता गवाणकर यांनी केले.
***
(जसंवि/५०८)

 किनारी रस्ता प्रकल्प व बोगदा कामांविषयी अतिरिक्त तपशीलः

महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबई किनारी रस्‍ता प्रकल्‍पाचे काम वेगाने सुरु आहे. प्रकल्‍पाचे जवळपास ५० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्‍प डिसेंबर, २०२३ मध्‍ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. विजय निघोट यांच्या समन्वयातून विविध कामे वेगाने सुरु आहेत.

मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी १ अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱया ‘छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

बोगदे बांधकाम अंतर्गत पहिला बोगदा खणन करण्‍याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून करण्‍यात आली होती. सदर बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्‍पा दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. तर २ किलो‍मीटरचा टप्‍पा दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला आहे. संपूर्ण २.०७० किलोमीटर अंतराच्या बोगद्याचे खणन करण्याचे काम आज (दिनांक १० जानेवारी २०२२) पूर्णत्वास आले. हा बोगदा मरिन ड्राइव्हकडे जाणाऱया वाहतुकीसाठी वापरात येणार आहे.

कोविड विषाणू साथरोगाच्या काळातदेखील या प्रकल्पाच्या बांधकामावर विपरित परिणाम न होऊ देता वेगाने काम करुन घेण्‍यामध्‍ये महानगरपालिकेला यश मिळाले आहे.

या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्‍येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण (Concrete Lining) केले जाते. त्‍यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्‍येकी ११ मीटर इतका असणार आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱया व जाणाऱया वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्‍मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे ए‍कंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील या बोगद्यांचा भाग असणार आहेत. यापैकी ७ छेद बोगदे हे प्रवासी तर ४ छेद बोगदे हे वाहनांसाठी उपयोगात येणारे आहेत. सदर बोगद्यांसाठी आपत्कालीन नियत्रंण कक्ष असून त्यामध्ये स्वयंचलित यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर बोगद्यांमध्‍ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्‍ये रस्‍ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे.

पहिल्या बोगद्याचे खणन काम पूर्ण झाल्याने आता दुसऱया बोगद्याचे कामही सुरु केले जाणार आहे. दुसऱया बोगद्याचे काम प्रियदर्शनी पार्क येथून सुरु करण्याचे आधी प्रस्तावित होते. मात्र, बोगदा खणणाऱया संयंत्र (टीबीएम – टनेल बोअरींग मशिन) चे संपूर्ण भाग सुटे करुन ते प्रियदर्शनी पार्कला नेणे, पुन्हा जोडणी करणे हे जास्त जिकीरीचे व वेळखाऊ ठरु शकते, ही बाब लक्षात घेवून, संयंत्राचे काही भाग सुटे करुन, चौपाटीवरुनच दुसऱया बोगद्याचे काम सुरु करण्याबाबत सल्लागारांनी अभ्यास केला. त्यानुसार आखणी करुन मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे साधारणतः एप्रिल २०२२ पासून दुसऱया बोगद्याचे खणन काम सुरु होवून डिसेंबर २०२२ पर्यंत ते पूर्णत्वास नेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे.

 ‘मावळा’ संयंत्राविषयीः

या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम – टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्‍यासाचे टीबीएम संयंत्र आहे. या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. १२.१९ मीटर व्यास असणाऱया मावळा संयंत्राची उंची ४ मजली इमारती एवढी आहे. तर त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे २८०० टन इतके असून त्‍याबरोबर वापरण्‍यात येणाऱया स्लरी ट्रीटमेंट प्लांट (Slurry Treatment Plant) च्‍या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे ६०० टन आहे. ‘मावळा’ संयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत (२.६ RPM).

‘मावळा’ संयंत्राचे वैशिष्‍ट्य म्हणजे ज्या ठिकाणी बोगदा खणावयाचा आहे, त्या ठिकाणी प्रथम ‘बेंटोनाईट’ (Bentonite) मिश्रित पाण्याचा अ‍त्‍यंत वेगवान फवारा केला जातो. त्यानंतर संयंत्राच्या १२.१९ मीटर व्यास असणाऱया चकती प्रकारच्‍या पात्याद्वारे बोगदा खणला जातो. बोगदा खणल्यामुळे निघणारी माती, खडी इत्यादी ही आधी फवारलेल्या पाण्यामध्ये एकत्र होऊन खडी व माती मिश्रित पाणी (Slurry) तयार होते. हे पाणी ‘मावळा’ या संयंत्राद्वारे खेचून बाहेर टाकले जाते. ते पुन्‍हा प्रक्रिया करुन वापरले जाते. खोदकामातून निघणारे खडक व खडी यांचाही उपयोग भराव कामात करण्‍यात येतो.

 मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) विषयीः मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतू (सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे. एवढेच नव्हे तर वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.

एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे. पॅकेज ४ अंतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उडाणपूल ते प्रियदर्शिनी पार्क हे ४.०५ किलोमीटर अंतर, पॅकेज १ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस हे ३.८२ किलोमीटर अंतर आणि पॅकेज २ मध्ये बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असे २.७१ किलोमीटर अंतर याप्रमाणे कामाची विभागणी करण्यात आली आहे.

पॅकेज ४ व पॅकेज १ चे कंत्राटदार मेसर्स लार्सन ऍड टुब्रो लिमिटेड आहेत. तर पॅकेज २ साठी मेसर्स एचसीसी-एचडीसी (संयुक्त उपक्रम) कंत्राटदार आहेत. प्रत्येक पॅकेजचे पर्यवेक्षण करण्यासाठी एक प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कंत्राटाचा अभियंता म्हणून काम करण्यासाठी एक मुख्य सल्लागार नेमला आहे.

Exit mobile version