Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र दिनापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी, तसंच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावानं मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही घोषणा केली.  तसा ठराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत झाला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदकं जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशननं राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. 2024, 2028, 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात लवकर तयार करुन राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावं. कोरोना संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावं, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा  दिन म्हणून ऑनलाइन पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.

Exit mobile version