नवी दिल्ली : ‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेत राजनाथ सिंह यांनी आज इतिहास रचला. तेजसमधून भरारी घेणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. स्वदेशी बनावटीच्या, हलक्या वजनाच्या आणि बहुविध कामगिरी बजावू शकणाऱ्या या विमानातून सिंह यांनी 30 मिनिटे उड्डाण केले. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या बंगळुरु इथल्या विमानतळावरुन सकाळी संरक्षणमंत्र्यांनी एअर व्हाईस मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्यासह तेजसमधून उड्डाण केले.
हा थरारक आणि विशेष अनुभव होता, असे सांगून हे विमान विकसित केल्याबद्दल सिंह यांनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड, डीआरडीओ आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे अभिनंदन केले. तेजससाठी विविध देशातून मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाला लढाऊ विमान आणि शस्त्रसामग्री निर्यात करण्याच्या टप्प्यापर्यंत भारत पोहोचल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.
भारतीय हवाई दल तसेच थलसेना आणि नौदलाचेही त्यांनी कौतुक केले.
संरक्षणमंत्र्यांनी काही काळ हवेत तेजसचे नियंत्रणही केले, अशी माहिती एअर व्हाईस मार्शल तिवारी यांनी दिली. तत्पूर्वी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सिंह यांना तेजस कशा प्रकारे काम करते ते सांगितले.