Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा

मुंबई : देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरहद्दीवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘भारतीय सैन्य दिना’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाचे ‘कमांडर इन चीफ’ म्हणून सूत्रे स्वीकारली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या सन्मानार्थ साजरा होत असलेला भारतीय सैन्य दिवस हा भारतीय सैन्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. देशाच्या संरक्षणासाठी रणरणत्या वाळवंटात, अंग गोठवणाऱ्या थंडीत आपले सैनिक कर्तव्य बजावत असतात. देशवासियांच्या संरक्षणासाठी स्वत:च्या प्राणांचं बलिदान करतात. त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेला तोड नाही. सैन्यदलातील अधिकारी व जवानांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आम्हाला अभिमान असून देशवासीय सदैव त्यांचे कृतज्ञ राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य दलांचा गौरव करुन शहीद वीरांना अभिवादन केले.

Exit mobile version