भारतीय सैन्य दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांसह मान्यवरांच्या शुभेच्छा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्य दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर तसंच इतर मान्यवरांनी भारतीय सेना आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत सैन्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या जवानांनी सीमेचं रक्षण आणि शांतता कायम ठेवताना व्यावसायिकता, त्याग आणि असीम शौर्याचं प्रदर्शन केलं असून देश त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञ असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातल्या ज्येष्ठ सैनिक आणि जवानांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या सुरक्षिततेबाबत सैन्याच्या अमूल्य योगदानाला केवळ शब्दातून न्याय देता येणार नाही असं ते म्हणाले. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांनीही सैन्य दिनानिमित्त भारतीय सैन्याला आणि त्यांच्या कुटुंबातील नायकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना धैर्य, शौर्य आणि त्यागाचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मातृभूमीचं रक्षण करताना केलेल्या सर्वोच्च त्यागाबद्दल त्यांनी शूर सैनिकांना सलाम केला आहे.देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सरहद्दीवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाचे ‘कमांडर इन चीफ’ म्हणून सूत्रे स्वीकारली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.