पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने कला, नृत्य क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Ekach Dheya
मुंबई: कथ्थक या नृत्य प्रकाराला देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने भारतीय कला आणि नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
शोकसंदेशात मंत्री श्री.देशमुख म्हणतात, पंडित बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. जगभरात त्यांचे अनेक शिष्य आता प्रसिद्ध कलाकार आहेत. कथ्थक नृत्य प्रकारात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बिरजू महाराज यांनी विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनही केले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानाने देखील त्यांचा गौरव झाला आहे. नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले, इतकं वैविध्यपूर्ण कार्य त्यांनी नृत्य क्षेत्रात केले आहे.
पंडित बिरजू महाराज यांनी महाराष्ट्राला आपला पिता आणि बंगालला माता मानले होते. त्यांच्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली पण विविध मानसन्मान व नावलौकिक त्यांना महाराष्ट्राने दिले, असे पंडित बिरजू महाराज यांनी एकदा म्हटले होते, त्यावरून त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा अभिमान दिसून येतो. अशा या जगप्रसिद्ध कथ्थक नृत्यगुरुंच्या निधनामुळे भारतीय कला, संगीत आणि नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे असे सांगून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.