Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातल्या जिल्हापरिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद, विविध जिल्ह्यांमधल्या नगरपंचायती आणि पंचायत समिती आणि हजारो ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू आहे. याठिकाणी गेल्या महिन्यात तसंच ओबींसींचं आरक्षण हटवलेल्या ठिकाणी काल मतदान झालं होतं. भंडारा जिल्हापरिषदेतल्या ५२ पैकी १० जागी काँग्रेस तर ९ जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला ३ आणि बसपाला १ जागा मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सहा नगरपंचायतींच्या प्रथमच झालेल्या निवडणूकींचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कळवण नगरपंचायतीच्या निवडणूकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मात्र त्यांच्या घरातील मान्यवरांनीच पराभवाचा धक्का दिला आहे. कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप १७ पैकी ९ जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने डॉ. भारती पवार यांचे दीर आणि राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांची सरशी झाली आहे.या नगरपंचायतीत भाजपाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला तीन, शिवसेनेला दोन आणि मनसेला एक जागा मिळाली आहे. लगतच्या दिंडोरी नगरपंचायतीत शिवसेनेने ६, राष्ट्रवादीने पाच आणि काँग्रेस पक्षाने दोन जागा मिळवून महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. भाजपाला चार जागा मिळाल्या आहेत.

सुरगाणा हा आदिवासी तालुका असून तेथे वर्षानुवर्षे असलेली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मक्तेदारी मोडीत काढत भाजपाने आपला झेंडा रोवला आहे. भाजपाचे माजी खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणूकीत भाजपाला आठ, शिवसेनेला दोन, राष्ट्रवादीला एक तर माकपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. निफाड नगरपंचायतीत शिवसेना आणि शहर विकास आघाडीचे वर्चस्व निर्माण केली असून त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे. यानिवडणूकीत शिवसेनेला सात तर शहर विकास आघाडीला चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला तीन तर बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसला प्रत्येकी एकेक जागा मिळाली. देवळा नगरपंचायतीत १७ पैकी १५ जागा भाजपने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादीला अवघ्या दोन जागा मिळाल्या. पेठ नगरपंचायतीत राष्ट्रवादीने आठ, शिवसेनेने ४ तर माकपाला ३ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्ष तर एका जागेवर भाजपला संधी मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यात बोदवड नगर पंचायतीमध्ये १७ पैकी ९ जागा शिवसेनेला, तर ७ राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. एका जागेवर भाजप उमेदवाराला विजय मिळाला. अमरावतीमध्ये तिवसा नगर पंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. तर भातकुली नगर पंचायतीवर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं वर्चस्व कायम ठेवलं आहे. सांगली जिल्ह्यात, कवठेमहांकाळ नगरपंचायती मध्ये रोहित आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. रोहित पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या पॅनलला निर्विवाद बहुमत मिळालं आहे. एकूण 17 पैकी 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या, तर 3 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. भाजपला 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

सोलापूरमध्ये मतदारांनी स्थानिक आघाड्यांना कौल दिला आहे. माढ्यात काँग्रेस, वैरागमध्ये राष्ट्रवादी, माळशिरसमध्ये भाजपा, श्रीपूरमध्ये मोहिते-पाटलांची स्थानिक आघाडी यांनी सत्ता मिळवली. जिल्ह्यातल्या माळशिरस नगरपंचायतीत १७ पैकी १० जागा भाजपानं मिळवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, आणि माविआ- प्रत्येकी २ भाजपा, तर ३ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. रत्नागिरीत दापोली नगर पंचायतीवर महाविकास आघाडीनं सत्ता मिळवली आहे. दापोलीत शिवसेनेला ६, राष्ट्रवादीला ८ जागा, भाजपला १ जागा मिळाली. साताऱ्यात पाटण दहीवडी, लोणंद, खंडाळा नगर पंचायतींवर राष्ट्रवादीनं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

यवतमाळमध्ये राळेगावात काँग्रेसची सत्ता आली तर उर्वरित ५ ठिकाणी त्रिशंकु परिस्थिती आहे. जिल्ह्यातल्या १०२ जागांपैकी ३९ जागा काँग्रेसनं, तर २५ जागा शिवसेनेनं पटकावल्या आहेत. भाजपाला १३ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. धुळे जिल्ह्यातल्या साक्री नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ जागा जिंकून भाजपानं सत्ता प्रस्थापित केली आहे. बीडमध्ये ५ नगर पंचायतीतल्या एकूण ८५ जागांपैकी ४९ भाजपाला, १८ राष्ट्रवादीला, ५ काँग्रेसला आणि २ शिवसेनेला मिळाल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ जागा भाजपानं जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन, तर कॉंग्रेसलाच एक जागा मिळाली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव नगर पंचायतीत १७ पैकी १७ जागांवर काँग्रेसनं  विजय मिळवला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं नायगाव, अर्धापूर आणि माहूर या  तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे.

Exit mobile version