Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र आणि न्यूजर्सीदरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

न्यू-जर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अमेरिकेतील न्यूजर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.  ‘न्यू-जर्सी बिझनेस मिशन टू इंडिया’च्या निमित्ताने आयोजित या भेटीत शिष्टमंडळात न्यू-जर्सीतील व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. यावेळी भारतात विशेषत: महाराष्ट्रात फिन-टेक, औषधी, जैव-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रातील संधी आणि गुंतवणुकीबाबत चर्चा झाली.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदान आदी उपस्थित होते. तर न्यू-जर्सीच्या शिष्टमंडळात अमेरिकेन वाणिज्य दूतावासातील इलिझाबेथ स्कोलोव्ह, जोश लुझानो, कॅथलीन फनजीरो, अन्डी शेणॅाय, वेस्ली मॅथ्यू, ऑर्थर कपूर, गुंजन दोशी, राजीव परीख आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई हे शहर भारताचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. हे शहर आर्थिक राजधानीबरोबरच, बँकिंग क्षेत्राचीही राजधानी आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आली आहे. तसेच रोजगार संधीतही महाराष्ट्र अग्रगण्य राज्य आहे. न्यू-जर्सीमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रीयन आहेत. त्यातही पुणेकरांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. त्यामुळे न्यू-जर्सीत एक विस्तारित भारत वसला आहे. त्या दृष्टीने या दोन्ही राज्यातील हे संबंध आणखी दृढ करता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील राज्यांनी स्वयंपूर्ण व्हावे आणि त्यांनी त्यांच्या विकासाची वाटचाल सक्षमपणे करावी अशी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि न्यू-जर्सीमधील विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करून, एक नवीन प्रवास सुरू करता येईल, अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य आहे. पण अलीकडे हवामान बदलामुळे राज्यात एकीकडे दुष्काळी आणि एकीकडे पूर अशी परिस्थिती ओढवते. त्यावर शाश्वत उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी जागतिक बँकेने सहकार्य देऊ केले आहे.  भारताच्या “फाईव्ह ट्रिलियन इकॉनॅामी”च्या वाटचालीत महाराष्ट्राचे मोठे योगदान राहील, असे प्रयत्न आहेत. त्यामुळेच शक्य त्या वेगाने “ट्रिलियन इकॅानॅामी”चे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच बरोबर कार्बन उत्सर्जनमुक्त स्वच्छ ऊर्जेचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वापर करण्यावर भर देत आहोत. राज्यातील कृषी क्षेत्रातील ऊर्जेची  मागणी सौर ऊर्जा पर्यायांतून पूर्ण व्हावी असे प्रयत्न आहेत. महाराष्ट्र हे ‘फिनटेक पॅालिसी” तयार करणारे देशातील  पहिले राज्य आहे. मुंबईजवळच “इंटिग्रेटेड फिनटेक टाऊनशिप” साकारतो आहोत.  अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच गुंतवणूक यावी असे प्रयत्न आहेत. कृषी क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करतानाच उत्पादनक्षम आणि सेवा क्षेत्रात संधी निर्माण व्हाव्यात याकडे लक्ष दिले जात आहे.

यावेळी गव्हर्नर श्री. फिलीप यांनी भारत आणि अमेरिकेचे सौहार्दपूर्ण संबंध आणखी दृढ आणि वृध्दिंगत होत असल्याचे सांगितले. दूरसंचार, तंत्रज्ञान, मनोरंजन क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक, आरोग्य सुविधा यांसह, शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य होतकरूंसाठी अनेक संधी घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला.

Exit mobile version