राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन
Ekach Dheya
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या प्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या 305 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, ई-मेल आयडी आणि विद्यमान कार्यकारणीतील सदस्यांचा तपशील राज्य निवडणूक आयोगास सादर करावा, असे आवाहन यापूर्वीदेखील करण्यात आले होते; परंतु बहुतांश राजकीय पक्षांकडून अद्याप हा तपशील प्राप्त झालेला नाही. ज्यांनी सादर केला आहे; परंतु त्यात बदल झाला असल्यास तो नव्याने द्यावा. कारण संपर्काच्या तपशिलाअभावी राजकीय पक्षांशी विविध कारणांनी संपर्क साधण्यात अडचणी येतात, ही बाब विचारात घेऊन हे तपशील देणे आवश्यक आहे. हे तपशील राजकीय पक्षांनी प्रमाणित करूनच आयोगाच्या कार्यालयास टपालाने (राज्य निवडणूक आयोग, 1 ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.) किंवा sec.mh@gov.in या ई-मेल आयडीवर पाठवावा, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.