पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून पीएमपीएमएलच्या ताफ्यात दोन नव्या कोऱ्या बस दाखल झाल्या आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या बसचे गुरूवारी लोकार्पण करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार निधीतून १ कोटी ३० लाख रुपये खर्चाचे दोन बस उपलब्ध करून दिले आहेत. पिंपळेगुरव येथील पीएमपी बस स्थानकाजवळ या बसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, नगरसेविका उषा मुंढे, माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, सीमा चौगुले, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, संजय मराठे, नवीन लायगुडे, मनिष कुलकर्णी, संतोष कलाटे आणि पीएमपीएमएलचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. चिंचवड मतदारसंघात तीन बीआरटीएस रस्ते सुरू करून त्यावर पीएमपीमार्फत सुरक्षितपणे बसचे संचलन केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असल्यास नागरिकांचा वेळ आणि पैशांचीही बचत होते. सामान्य प्रवाशांचा विचार करूनच पीएमपीएमएलने प्रवासासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”