सागरी उत्पादनांच्या निर्यातीत पहिल्या नऊ महिन्यात ३५ टक्क्यांनी वाढ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ३५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही निर्यात ६ पूर्णांक १ अब्ज डॉलर्स पर्यंत पोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. २०२० मध्ये याच कालावधीत ही सागरी उत्पादनांची निर्यात ४ पूर्णांक ५ अब्ज डॉलर्स नोंदवण्यात आली होती. एप्रिल-डिसेंबर २०१९ मध्ये ही वाढ ५ पूर्णांक ५ अब्ज डॉलर्स इतकी होती. ही वाढ अनुक्रमे १२ आणि ३८ टक्के होती. डिसेंबर २०२० मध्ये नोंदवलेल्या ५६२ पूर्णांक ८५ दशलक्ष डॉलर्स निर्यातीच्या तुलनेत ही वाढ २८.१ टक्क्यांची वाढ नोंदवत डिसेंबर २०२१ मध्ये, सागरी उत्पादनांची निर्यात ७२० पूर्णांक ५१ दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचली.
अमेरिका, चीन , जपान व्हिएतनाम आणि थायलंड या पाच प्रमूख देशांमध्ये ही निर्यात केली गेली. भारतातून सागरी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत १९७२ मध्ये स्थापन केलेल्या सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण या वैधानिक संस्थेद्वारे मत्स्य क्षेत्रासाठी अनेक निर्यात प्रोत्साहन योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मे २०२० मध्ये १०० विविध उपक्रमांसह प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा प्रारंभ केला.
आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या ५ वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जात आहेत. या योजनेअंतर्गत मत्स्य क्षेत्रात १लाख कोटींची निर्यात, अतिरिक्त ७० लाख टन मत्स्य उत्पादन आणि आगामी काळात ५५ लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्टं ठेवण्यात आलं आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.