Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, शिक्षण घेत असलेल्या शाळा-महाविद्यालयातच होणार परीक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र, उपकेंद्र दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, त्यांना लेखी परीक्षा देता येईल, असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परिक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धातास, तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. सर्व परिक्षा केंद्रांवर, कोविड-१९ मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली, तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परिक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल. एखादा विद्यार्थी आजारी पडला, किंवा अपरिहार्य कारणामुळे तोंडी परीक्षा, अंतर्गत तसंच तत्सम मूल्यमापन, प्रात्यक्षिक- सादर करु शकला नाही, तर लेखी परीक्षानंतर त्याला यासाठी पुन्हा संधी दिली जाईल.  त्यासाठी वेगळं शुल्क घेतलं जाणार नाही. परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते चार एप्रिलदरम्यान, तर प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा चार ते ३० मार्च दरम्यान होणार असून, १४ फेब्रुवारी ते तीन मार्च या काळात प्रात्यक्षिक परीक्षा होईल, अशी माहिती गोसावी यांनी दिली. कोरोनामुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या काळात पुन्हा संधी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version